लोणी काळभोर : गेल्या काही दिवसां पासून सुरू असलेला रिमझिम पावसामुळे लोणी काळभोर (ता. हवेली) येथील तीर्थक्षेत्र रामदरा परिसरातील डोंगर हिरवागार झाला असून पुणे शहर व परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी येथे होत आहे. धार्मिक तसेच नैसर्गिक पर्यटन स्थळ म्हणून या परिसराचा विकास करण्याची गरज असून आतापर्यंत तरी शासकीय पातळीवर त्या संदर्भात काहीच हालचाल झालेली नाही.
पावसाळी धुके, रिमझिम पाऊस आणि थंडगार वाऱ्यात विलोभनीय निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी व धार्मिक पर्यटन करण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी गर्दी करीत आहेत. करोना महामारी नंतर, लाॅकडाऊन संपल्यावर तीर्थक्षेत्र रामदरा येथे येणा-या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे शहर व परिसरातील नागरिकांना धार्मिक, नैसर्गिक पर्यटन करण्यासाठी व हौशी तरुणांना ट्रेकींगचे प्राथमिक धडे गिरवण्यासाठी असलेला सह्याद्रीच्या पर्वत रांगातील डोंगर यामुळे या ठिकाणी खुप मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. सध्या चालू असलेल्या पावसामुळे डोंगर पुर्णपणे हिरवागार झाला असून एखाद्या नववधूने हिरवा शालू नेसल्या सारखा सुंदर दिसत आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याशी महामार्गावरुन सात किलोमीटर अंतरावर तीर्थक्षेत्र रामदरा वसले आहे. जाताना लागणारा रस्ता थोडा अरुंद असून या रस्त्यावर बरेच खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. प्रशासनाने कमीत कमी “क वर्ग देवस्थान” म्हणून दर्जा देऊन या परिसराचा विकास करण्याची गरज आहे. मात्र या संदर्भात कुठे माशी शिंकत आहे हे कळण्यास काही मार्ग नाही.
येथे दर गुरुवार, शनिवार व रविवारी खुप गर्दी होते. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी पोलीस बंदोबस्त देण्यास सुरवात केली आहे. राज्य सरकारच्या इतर खात्यांनीही पोलीस खात्याचे अनुकरण करुन तीर्थक्षेत्र रामदरा परिसराचा विकास करण्याची गरज आहे. त्यामुळे येथे येणा-या हजारो भाविकांना सोयीसुविधा उभ्या राहतील.
मात्र या संदर्भात कुठल्याही शासकीय विभागाने अद्याप पर्यंत तत्परता दाखवली नाही. तीर्थक्षेत्र रामदरा येथे जाताना खडकवासला धरण साखळीतील पाणी हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील ६६ हजार हेक्टर शेतीला पाणी पुरवठा करणा-या नवा मुठा उजवा कालवा ओंलाडून जावे लागते. या कालव्या वरील पूल १९६५ साली बांधला आहे. ५७ वर्षं वयाचा हा पूल कुमकुवत झाला आहे. या पुलाचे बांधकाम ढासळले आहे. हा पूल कधीही पडू शकतो. तीर्थक्षेत्र रामदरा येथे जाणा-या पाच हजार भाविकांना याच पूलावरून जावे लागते.
सध्या पुणे महानगरपालिकेच्या पीएमपीएमएलच्या वतीने येथे बससेवा सुरू करण्यात आली आहे. एखादी बस घेऊन जर हा कुमकुवत पुल पडला तर प्रचंड जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. फुरसुंगी रेल्वे स्थानकावर सुरू झालेल्या मालधक्क्यावरुन २५ – ३० टन माल वाहतूक करणा-या हायवा, डंपर गाड्या ही याच पूलावरून जातात. मात्र जलसंपदा विभाग अजूनही या पुलाच्या दुरुस्ती संदर्भात निर्णय घेत नाही. या ठिकाणी तातडीने नवीन पूल बांधण्याची गरज आहे. अन्यथा तीर्थक्षेत्र रामदरा येथे येणा-या भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन खुप मोठी जीवीत हानी होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी काळभोर यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना एक निवेदन दिले आहे. या पुलावरून चारचाकी गाडी व एखादे अवजड वाहन गेल्यास हा पूल हलत आहे. हवेली तालुक्यातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र असलेल्या रामदरा शिवालय या ठिकाणी जाण्यासाठी याच पुलावरून जावे लागते. त्यामुळे दररोज सुमारे एक हजार पेक्षा जास्त भाविक या ठिकाणावरून ये जा करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची भीती स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील कोळपे वस्ती, केसकर वस्ती, रुपनर वस्ती, ढेले वस्ती, फुरसुंगी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी व या परिसरातील शेताकडे तसेच तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात जाण्यासाठी याच पुलाचा वापर करून जावे लागते. तसेच वाहनचालकांना सावधानता बाळगत या मार्गावरून जावे लागत आहे. त्यामुळे याकडे जलसंपदा विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.
रामदरा या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांना व कोळपे वस्ती, रूपनर वस्ती, केसकर वस्ती या ठिकाणी राहणा-या स्थानिक नागरिकांना लोणी काळभोर गावात येण्यासाठी हा एकच रस्ता आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना पुलाचा अंदाज आला आहे. परंतु नवख्या लोकांना पुलाचा अंदाज नसल्याने तसेच पुलाची माहिती नसल्याने मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गावामध्ये येण्यासाठी एकच पूल असल्याने प्रवासास धोका आहे. त्याच पुलावरील उघडे कठडे प्रवाशांना अपघातास निमंत्रण देत आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे असून नसल्यासारखेच आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दिड वर्षांपासून घरात बसून पुरुष, महिला, लहान मुले, जेष्ठ नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे लोणी काळभोर परिसरातील व पुणे शहरातील साधारण एक हजार नागरिक आपली दुचाकी, चारचाकी घेऊन तीर्थक्षेत्र रामदरा येथे सहकुटुंब येतात. त्या बरोबरच तरुण पिढीमध्ये सध्या ट्रेकींगची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र रामदरा परिसरातील डोंगरावर ट्रेकींगसाठी येणा-या युवकांची संख्याही खुप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सर्वां बरोबरच स्थानिक नागरिकांना येण्या जाण्यासाठी याच पुलाचा वापर करावा लागतो.
गेल्या एक वर्षापासून फुरसुंगी रेल्वे स्थानकावर मालधक्का सुरू झालेला आहे. या मालधक्क्यावरुन सिमेंट, सिमेंट सदृष्य माती आदी वस्तूंची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. ३० ते ३५ टन माल भरलेल्या ट्रक या पूलावरून जातात. त्यावेळी पूल अक्षरशः हलतो. एखाद्या गाडी सह पूल लवकरच कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच या ठिकाणी नवीन पूल बांधावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तीर्थक्षेत्र रामदरा येथे जाणा-या रस्त्यावर पुणे कोल्हापूर या लोहमार्गावर पूल बांधावा अशी मागणी ब-याच वर्षांपूर्वी स्थानिक नागरिकांनी केली होती. परंतु तत्कालीन प्रशासनाने या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. शेवटी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग आली.
दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगर येथील नाथ हरी पुरंदरे विद्यालयाच्या सहलीची बस व रेल्वे यांचा अपघात झाला. या अपघातात शिक्षक, मुले, मुली यांच्या सह ३८ जण मृत्यू मुखी पडले. हि दुर्घटना एवढी भीषण होती कि तत्कालीन रेल्वे मंत्री सी के जाफर शरीफ हे दिल्लीहून घटनास्थळाला भेट देण्यासाठी आले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग आली. नंतर लोहमार्गावर तातडीने पूल बांधण्यात आला. अशी एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच कालव्यावर नवीन पूल बांधावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. हे अपघात स्थळ कालव्या वरील पूलापासून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.