पुणे : पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी १० लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरोधात तसेच बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
अमूल डेअरीची डिस्ट्रीब्युशन फ्रॅन्चायझी देण्याच्या बहाण्याने पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला १० लाख ४२ हजार रुपयांना चोरट्यांनी लुटले. हा सर्व प्रकार गेल्या १ महिन्यापासून सुरू होता.आपल्याला फ्रॅन्चायझी मिळेल या आशेने त्यांनी एका महिन्यात तब्बल १० लाखापेक्षा अधिक रक्कम जमा केली. मात्र अजून काही रक्कम लागणार असल्याची मागणी समोरून होत होती मात्र काम होत नव्हते हे लक्षात येताच आपली आपली फसवणूक झाली आहे, हे कळल्यावर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
आरोपींकडून फिर्यादी यांना फोन करुन अमूल डेअरी डिस्ट्रीब्युशन फ्रॅन्चायझी देण्याची बतावणी केली. गुजरातमधील आनंद येथे अमूलचे मुख्य कार्यालय असल्या कारणाने तेथील स्थित्त असलेल्या इंडियन बँकेच्या खात्यात पैसे भरायला सांगितल्याने फिर्यादी यांना विश्वास बसला, त्यानंतर त्यांची फसवणूक झाली.