राहुलकुमार अवचट
यवत – मित्रांच्या स्मृतीदिनानिमित्त यवत (दौंड) येथील हरितवारी फाऊंडेशनच्या वतीने रविवारी (ता.१८) श्री काळभैरवनाथ मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ११६ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
यवत (ता. दौंड) येथील हरितवारी फाऊंडेशनचे सभासद असलेल्या कै. प्रकाश वरुडकर यांचे अपघाती तर कै. संभाजी उर्फ बबलु दोरगे यांचे गेल्या वर्षी कोरोना महामारीत निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हरितवारी फाऊंडेशन यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण पवार, उपसरपंच सुभाष यादव ह.भ.प नाना महाराज दोरगे आणि ह.भ.प राहुल महाराज राजगुरु आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, समाजकार्याची आवड असणाऱ्यांना समाजकार्य करुन श्रद्धांजली वाहु. चला कोणाचे तरी प्राण वाचवु.. चला रक्तदान करु. चला रक्तदान करू. या आवाहनाला प्रतिसाद देत यवत पंचक्रोशीतील मित्रपरिवाराच्या वतीने अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली. सकाळी १० वाजता सुरु झालेल्या या शिबीरास दिवसभरात ११६ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. सर्व रक्तदात्यांचे हरितवारी फाऊंडेशनच्या वतीने आभार मानण्यात आले.