जुन्नर : कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वडगाव आनंद (ता. जुन्नर) परिसरातील रानमळा येथे शनिवारी (ता.१७) उघडकीस आली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दशरथ लक्ष्मण केदारी (रा. वडगाव आनंद ता. जुन्नर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ केदारी हे एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. केदारी यांनी कर्जबाजारीपणा व शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शनिवारी शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे. फायनान्सवाले दमदाटी करतात, पतसंस्थावाले अपशब्द वापरतात. शेतीमालाला रास्त बाजारभाव मिळत नाही. पंतप्रधान नरेंद मोदी यांचा शेतीवर कंट्रोल नाही. तसेच याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. त्यामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. असे म्हणत शेवटी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.