Weather Update : मुंबई : राज्याला अवकाळी पावसाचा धोका कायम आहे. राज्यात १ आणि २ डिसेंबरला पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. परिणामी राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे तर कुठे ऑरेंज अलर्ट दिला आहे. विगर्भ आणि मराठवाड्याला १ डिसेंबरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. यात अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील २४ तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे शहरातही आज पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रावर हवेची चक्राकार परिस्थिती आहे. कारण, उत्तर केरळपासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे.
लाल मिरचीचे दर वाढणार
अवकाळी पावसामुळे लाल मिरचीचे दर वाढण्याची शक्यता आहे. पावसामुळे मुंबईच्या बाजार समितीत येणाऱ्या लाल मिरचीचे आगमन आता लांबणीवर पडले आहे. त्यामुळे घरोघरी वर्षभरासाठी मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीची टंचाई भासणार आहे. वाशीतील घाऊक मसाला बाजारात दिवाळीनंतर मसाल्याच्या मिरचीची आवक सुरू होते.