रायगड : कर्जतमधील निर्धार सभेत बोलताना महायुतीत लोकसभेच्या चार जागा अजित पवार गट लढवणार असल्याचे आज अजित पवारांनी जाहीर केले आहे. बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणारच आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत. (Loksabha Election)
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून आणायचे आहेत.
बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागा आपण निवडणार आहोत. इतर जागांसंदर्भात आपण शिंदे, फडणवीसांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू. जागावाटपासंदर्भात या सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. आपल्या कार्यकर्त्याची ताकद पाहून आपण त्यांची निवड करणार आहोत.
राज्य विधानसभेचे अधिवेशन ७ फेब्रवारीपासून होत आहे. त्यात पूर्णअर्थसंकल्प मांडता येणार नाही. परंतु महत्वाच्या कामांना निधी मंजूर केले जाणार आहे. आमच्यावर आरोप होते की गुन्हे दाखल होते म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो. विकास कामे व्हावी, यासाठी आपण सरकारमध्ये आला आहोत. माझ्यावर जे आरोप झाले ते निर्णय मी एकट्याने घेतले नव्हते. त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी होती. असेही अजित पवार म्हणाले.