Pune Crime: पुणे : आंतरजातीय विवाह केलेल्या महिलेने तिच्या मुलाला हिंदू धर्माप्रमाणे टिळा लावल्याच्या तसेच मुस्लिम महिलांप्रमाणे स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन कौटुंबिक अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सासरच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना २०१४ पासून आजपर्यंत नाना पेठ, हडपसर, म्हाडा वसाहत, खडीमशीन चौक, मिठा नगर, कोंढवा या ठिकाणी घडली. पोलिसांनी ३१ वर्षीय पती आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी पती यांनी आंतरजातीय प्रेम विवाह झालेला होता. त्यांना एक मुलगा आहे. आरोपींनी वेळोवेळी कौटुंबिक कारणावरून सदर महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली.
मुस्लिम महिलांप्रमाणे स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरून त्यांना मारहाण करण्यात आली. ही महिला तिच्या मुलाला कपाळावर टिळा लावत होती. त्यावरून चिडलेले आरोपी हा टिळा पुसून टाक, या प्रथा आमच्या घरात चालणार नाहीत असे म्हणत होते. त्यानंतर त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देण्यास आरोपींनी सुरुवात केली. तसेच त्यांच्याकडून घेतलेले सहा तोळे सोने देखील त्यांना परत करण्यात आले नाहीत. पतीने महिलेच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे देखील फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.