उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मुळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे चौक ते पेठ – थेऊर उडाणपूल या जुन्या पुणे-सोलापूर महामार्गाची उखडलेल्या रस्त्यांमुळे अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत असून नागरिकांना अपंगत्व येत आहे. तरीही प्रशासन ढिम्म आहे. पावसाळा संपत आला आहे तरीहि या रस्त्यावरील साधे खड्डेहि बुजविण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी व ग्रामस्थांनी केली आहे.
कोरेगाव मुळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे चौक ते पेठ – थेऊर उडाणपूल या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे डांबरही निघाले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम दर वेळेस करण्यात येते, आणि प्रत्येकवेळी रस्ते पुन्हा नादुरुस्त होतात. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. या मार्गावरून पुणे सोलापूर महामार्ग, अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर येथील चिंतामणीमंदिर, तसेच थेऊर केसनंद मार्गे, वाघोली, नगर रोडला जाता येते.
शिक्षण, कामास जाणारे, व्यवसायाच्या निमित्ताने नागरिकांची या रोडने नेहमीच वर्दळ पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नेमका कोणता खड्डा चुकवायचा हेच समजत नाही. दुचाकी व चारचाकी वाहनांना अपघाताचा नेहमीच धोका असतो. म्हणून बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन या पुलाची दुरुस्ती करून मार्गावरील खड्डे बुजवावेत व या रस्त्याच्या सबंधित येणाऱ्या आधिकारी वर्गाने व लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, जड वाहनांची नेहमीच ये-जा सुरू असल्याने डांबर उखडून खड्डे निर्माण होत आहेत. या मार्गाने माल वाहून नेणारे ट्रक सतत जात असतात. मात्र निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्योन रस्ते सतत उखडतात आणि गढ्ढे तयार होतात. त्यामुळे प्रवासी वाहने, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांना आपला जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून जावे लागत आहे.
याबाबत पेठचे सरपंच तानाजी चौधरी म्हणाले, “जुना पुणे-सोलापूर महामार्गाला महाविकास आघाडी सरकारने रस्त्याला निधी मंजूर केला होता. आताच्या सरकारने सर्वच कामाला स्थगिती देण्यात आली असल्यामुळे शनिवारी (ता.१७) शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांना या रस्त्यांसंदर्भात निवेदन दिले आहे. रस्ता दुसऱ्या कोणत्याही फंडातून मंजूर करून रस्त्याचे काम सुरु करावे.”
याबाबत थेऊर येथील ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे म्हणाले, “आमदार अशोक पवार यांनी या कामाला मंजुरी दिली होती. नवीन सरकारने जुन्या सर्व कामांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. तरी लवकरात लवकर नवीन फंडातून या रस्त्याचे काम सुरु करावे.”