सणसवाडी (पुणे) : पुणे-नगर महामार्गावरील सणसवाडी (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीतील एस जी पार्किंग समोरील रस्ता दुभाजकाजवळ आढळलेल्या तरुणाचा खून नव्हे तर अपघातात मृत्यू झाला आहे. पुण्याहून नगरच्या दिशेने जाण्याऱ्या एका अनोळखी वाहनाने तरुणाला आज रविवारी (ता.१८) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता कि, या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
कृष्णा प्रेमसिंग राठोड (वय- २६, रा. लखमापुर, ता.माहूर जि नांदेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांना सणसवाडी येथील एस जी पार्किंग समोरील रस्ता दुभाजकाजवळ एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. त्याच्या तोंडावर, डोक्यावर, चाकूने वार केल्यासारखे दिसून येत होते. त्यामुळे प्रथमदर्शी नागरिकांना हा खून असल्याचा संशय आला होता.
या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सदर तरुणाची पाहणी केली असता त्याच्या चेहऱ्यावर वार केल्याचे प्रथमदर्शी दिसून आले होते. पंचनामा करून सदर घटनेचा शिक्रापूर पोलीस तपास करीत असताना पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अनोळखी मृतदेहाची ओळख पटवली.
तपासादरम्यान, कृष्णा राठोड याचा सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला असल्याचा दावा शिक्रापूर पोलिसांनी केला आहे.