Nagpur City News : नागपूर : आता नागपूर शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा मार्ग मोकळा झाला आहे. नेदरलॅंड येथील कंपनी बायोगॅस, कंपोस्ट खत तसेच इंधन तयार करणार आहे. दररोज १ हजार २०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमीपूजन पार पडले आहे. अशाप्रकारचा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. शहरातील कचऱ्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने नेदरलॅंड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट कंपनीसोबत एप्रिलमध्येच करार केला. या प्रकल्पातून दररोज ३० ते ३५ टन कंप्रेस्ड बायोगॅसची निर्मिती होणार आहे.
तयार झालेला बायोगॅस आंतरराष्ट्रीय बाजारात विकला जाणार असून महापालिकेला ५० टक्के नफा मिळणार आहे. याशिवाय कंपनी महापालिकेला दरवर्षी १५ लाख रुपयेही देणार आहे. देखभाल व दुरुस्ती कालावधीत वाढीव रॉयल्टी देण्याबाबत कंपनीने करार केला आहे. त्यासाठी कंपनी ३०० कोटी रुपये खर्च करणार आहे.
कचऱ्यापासून तयार करणार बायोगॅस
भांडेवाडी येथे बायोगॅस प्रकल्प उभारला जाणार आहे. महापालिकेने प्रकल्पासाठी कंपनीला ३० एकर जागा लीजवर जागा दिली आहे. एकूण ९ एकर जागेत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. दररोज निघणाऱ्या कचऱ्यासह भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये जमा झालेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. पुढील १८ महिन्यांत प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे मनपाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी नमुद केले आहे.