पुणे : राज्यात काही भागात हलक्या ते मध्यम पावसासह जोरदार गारपीट झाली आहे. पुण्यासह नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह गारपीट झाली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड तसेच नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अनेक भागांचा समावेश आहे. (Maharashtra Rain Update)
पुण्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी या परिसरात साडेतीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्याची तारांबळ उडाली होती. यामध्ये अनेक शेतकऱ्यांची उस, कडवळ, मका, ही पीके भुईसपाट झाली असून तरकारी मालाचे नुकसान झाले आहे.
तसेच मंचर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पुणे-नाशिक महामार्गावर पाणीच पाणी साचले होते. तसेच एका हॉटेल जवळ मोठे लिंबाचे झाड महावितरणच्या वीज वाहक तारांवर कोसळल्याने काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच चार चाकी वाहनावर झाड पडल्याने वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. (Pune Weather Update)
‘या’ राज्यात २७ नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता
पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांशी संयोग होऊन कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग आणि गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. २६ तारखेला उत्तर मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे.
पुढील तीन तासांत मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता
पुढील तीन तासांत काही ठिकाणी मध्यम पाऊस, तुरळक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासोबत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर तसेच पश्चिम महाराष्ट्रात पुणे या जिल्ह्यासह मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, बीड, जालना तर विदर्भात बुलढाणा, अकोला जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात अली आहे.