पुणे : राज्यात हिवाळ्यातील गुलाबी थंडीची चाहूल लागत असतानाच पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. चार दिवस काही ठिकाणी यलो तर कागी ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे ऐन हिवाळ्यात नागरिकांना छत्र्या, रेनकोट काढावे लागणार आहेत. पुणे हवामान खात्याने २५ ते २६ नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होऊ शकते, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.(Weather Update)
दरम्यान, अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. परंतु खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी शेतात कापूस किंवा इतर माल ठेवला असेल तर त्याची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील फक्त जळगाव जिल्ह्यात कोणताही अलर्ट नाही.(Yellow Alert)
विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्हा वगळता इतर ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. कोकणातही २५ नोव्हेंबरसाठी यलो अलर्ट असणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील इतर जिल्ह्यांत यलो अलर्ट असणार आहे. २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट असणार आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.(Orange Alert)