सोलापूर : कांदा कधी शेतकऱ्यांना हसवतो, तर कधी वांदा करतो… मागील महिन्यात कांद्याला ६० ते ७० रुपये भाव मिळाला होता. त्यानंतर एका आठवड्यात जवळपास ३ हजार गाडी कांद्याची आवक झाली. आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. महिन्याभरात कांदा अर्ध्या किमतीवर आला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याच्या दरातील घसरण रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कांदा नगदी पीक असल्यामुळे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. यंदा देखील लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्याचवेळी कांद्याचे दर घसरले आहेत. नाशिक जिल्ह्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही कांद्याचे दर घसरले आहेत. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत.
मागील महिन्यात कांद्याला ६० ते ७० रुपये भाव होता. एका आठवड्यात जवळपास 3 हजार गाडी कांद्याची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याची आवक वाढल्यामुळे भावात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, १५ दिवसांपूर्वी कांद्याला सरासरी प्रति क्विंटल ३२०० ते ३५०० इतका भाव मिळत होता. त्यात क्विंटल मागे ३०० ते ८०० रुपये घसरण झाली आहे. ६ नोव्हेंबर रोजी कांद्याला जास्तीतजास्त ४ हजार रुपये दर होता. आता कांद्याला प्रति क्विंटल २६०० ते ३२०० इतका भाव मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याच्या दरातील घसरण रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
विंचूर बाजार समितीने गेल्या चार महिन्यांत कांदा लिलावात आघाडी घेतली आहे. विंचूरमध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील पंधरा दिवसांत ६ लाख ९७ हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी दाखल झाला. आता येत्या काही दिवसांत अधिक कांद्याचे लिलाव करण्यावर भर दिला आहे.