हिंगोली : पुण्यात झालेल्या मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत मराठा समाजासह इतर खुल्या प्रवर्गातील जातींमधील मागासलेपणाचे सर्वेक्षण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र या सर्वक्षणाला ओबीसी नेत्यांकडून विरोध करण्यात येत असून मागासवर्ग आयोगाचे सर्वेक्षण ताबडतोब थांबवा, तसेच, मराठा समाजाचे मागासलेपण कितीवेळा तपासणार अशी मागणीच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. (Prakash Shedge)
याबाबत बोलतांना प्रकाश शेंडगे म्हणाले की, हे सगळं भयानक असून मागासलेपण तपासा हे कुणी सांगितलं, अशी कोणीही मागणी केलेली नसून अशाप्रकारे कोणतेही सर्वेक्षण करण्यात यावे हे ओबीसी समाजाला मुळीच मान्य नाही. ओबीसी समाजातून कोणीही पुन्हा आमचे मागासलेपण तपासण्याची मागणी करणार नाही. अशाप्रकारचे सर्वेक्षण ताबडतोब थांबविण्यात यावे, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.
ते पुढे बोलताना म्हणाले, मराठा समाजाचे नेते बाळासाहेब सराटे यांनी न्यायालयात सध्याच्या ओबीसीत असलेल्या समाजाचे पुन्हा मागासलेपण तपासण्याची मागणी केली आहे. पण यावर अजून सुनावणी बाकी आहे.सुनावणीनंतर जो काही निर्णय आहे तो न्यायालय देईल. मात्र, त्यापूर्वीच सरकराने त्याची अमलबजावणी सुरु केली असून, हे सर्वकाही भयानक आहे. त्यामुळे हे ओबीसी समाजाला मुळीच मान्य नाही, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.
पुढे म्हणाले की, मराठा समाजाचे मागासलेपण तुम्हाला पुन्हा तपासायचे असेल तर त्याला आमचा विरोध नाही नाही. परंतु त्या अगोदर मागील 10 वर्षांपासून 130 जातींचा सर्वेक्षण करणे बाकी आहे, ते आधी तपासले पाहिजे. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याची आता ही चौथी ते पाचवी वेळ असून आणखी कितीवेळा तपासणार आहे. त्यामुळे मागासवर्ग आयोग राज्य सरकारच्या हातातलं बाहुल बनत असेल तर त्याला आमचा विरोध असणार आहे, असेही प्रकाश शेंडगे म्हणाले.