पुणे : प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पानमसाला, सुगंधित तंबाखूचा तब्बल ६ लाख ४९ हजार २० रुपये किमतीचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने जप्त करण्यात आला. बोराडेवाडी, मोशी प्राधिकरण परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. या वेळी पदार्थ साठवणूक आणि वाहतूक करणारे वाहनदेखील जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.
या कारवाईत विमल पानमसाला, आरएमडी पानमसाला, व्ही १ सुगंधित तंबाखु व एम सुगंधित तंबाखु इत्यादी प्रतिबंधित असलेल्या पदार्थांचा साठा वाहन क्रमांक (एम.एच. १४ एच.यू. २०४२) या वाहनातून जप्त करण्यात आला आहे. तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्रीसाठी साठवण करणारे आरोपी किशोर हरकचंद सुंदेचा यांच्याविरूद्ध भोसरी औद्यागिक वसाहत पोलीस ठाणे, मोशी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, १८ जुलै २०२३ च्या आदेशानुसार नागरिकांचे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखूजन्य पदार्थांवर उत्पादक, साठा, वितरण, विक्री यावर १ वर्षासाठी बंदी घातली आहे.
दरम्यान, तुपाचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या गुप्त कारखान्याचा पर्दाफाश काही दिवसांपूर्वी पोलिसांनी केला होता. शहरातील पाषाण गावातील भगवतीनगर येथे टिन शेडमध्ये लपलेल्या भूमिगत कारखान्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी कारखान्यावर छापा टाकला होता.
बुधवार पेठेतील रहिवासी असलेला संग्रामसिंग तेजसिंग राजपूत (वय ३८) बनावट तूप तयार करत असल्याचे उघड झाले होते. अशा प्रकारचे अनेक गुन्हे सध्या उघडकीस येत आहेत. प्रशासनामार्फत लवकरच याबाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. गैरप्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.
या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा…
सणासुदीच्या काळात ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.