चंद्रपूर: अस्थी विसर्जन करताना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे यांच्यासह तीन जण बुडाल्याची हृदयदायक घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) जवळच्या इरई नदीच्या संगमावर रविवारी दुपारी २ वाजता घडली.
बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील रहिवासी व चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पांहुरंग पोडे (४७), त्यांचा एकुलता एक मुलगा चेतन गोविंदा पोडे (१६) व भाचा गणेश रवींद्र उभरे (१७) अशी नदीत वाहून गेलेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शोधमोहिमेत सायंकाळी गोविंदा पोडे यांचा मुलगा चेतन पोडे व भाचा गणेश उपरे यांचा मृतदेह नावाड्यांनी बाहेर काढला. काही तासानंतर गोविंदा पोडे यांचा मृतदेहही सापडला.
नांदगाव (पोडे) येथील घनश्याम पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले होते. रविवारी त्यांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी कुटुंब इरई नदीच्या संगमावर दुपारी १ वाजता गेले होते, पूजाअर्चा करून अस्थी विसर्जन केले. त्यावेळी चेतन पोडे आणि गणेश उपरे हे नदीच्या पाण्यात पोहत होते. त्यावेळी गोविंदा पोडे यांनी दोघांनाही पाण्याच्या बाहेर यां, म्हणून आवाज दिला. त्यावेळी ते बाहेर निघत असताना पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहू लागले.
मुलगा व भाचा यांना वाचविण्यासाठी गोविंदा पोडे यांनी नदीपात्रात उडी घेऊन त्यांना वाचविण्याचा भरपूर प्रयत्न केला तरीदेखील ते देखील वाहत्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेची माहिती होताच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ रेस्क्यू टीम घटनास्थळी पाठविली व त्यासोबत चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, बल्लारपूर पोलिस निरीक्षक उमेश पाटील, चंदपुर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीशसिंह राजपूत, बल्लारपूरच्या तहसीलदार कांचन जगताप आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.