Picnic Preparation : पुणे : सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन केला जातो. पण तयारी कशी करावी, काय घ्यावं, काय नको हे समजत नाही. त्यामुळे बऱ्याचदा सारं काही करूनही काहीना काहीतरी राहून जातंच. म्हणून योग्य नियोजन अर्थात प्लॅन करणं गरजेचे बनते. मात्र, हे करावं कसं हे माहिती नसते. याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
फिरायला जाताना जर आपल्यासोबत लहान मूल असेल तर उलटी वगैरे होऊन त्याचे स्वत:चे व आई-बाबांचे कपडेही खराब होऊ शकतात. अशावेळेस प्रवासात नेहमीच बॅगा उघडून पुढच्या गोष्टी करणे सहज शक्य होत नाही. यासाठी वरच्या बॅगेत बाळाचा एक ड्रेस, आईचा एक कुर्ता व बाबांचा एखादा टी-शर्ट ठेऊन द्यावा. त्याने फायदा होऊ शकतो. तसेच आंघोळीचा ओला साबण बुळबुळीत होऊन तो सांभाळायला अवघड तर जातोच, उलट तो इतर कपडे खराब करण्याचा जास्त संभव असतो. शिवाय, कपडे धुण्यासाठी साबणवडी घेण्यापेक्षा साबण पावडर घेतली तर ती ओली वडीबरोबर फिरवावी लागत नाही.
एखादी बाटली, टोपी, गॉगल, कॅमेरा, स्कार्फ, एखादे खाऊचे पाकिट इत्यादी सोबत ठेवता येईल. काही तातडीची औषधे व बॅन्ड-एडसारख्या वस्तूही सोबत असायला हरकत नाही. कित्येकदा अशी औषधे हॉटेलवर राहतात आणि ऐनवेळी धावपळ होते. फिरताना हात रिकामे असतील तर अधिक उत्तम. त्यामुळे या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे बनते.