राहुलकुमार अवचट
यवत : खानवडी (ता. पुरंदर) येथे २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सोळाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री डॉ. स्वाती शिंदे-पवार यांची निवड झाली आहे. स्वागताध्यक्षपदी ह.भ.प. जगदीश महाराज उंद्रे यांची तर निमंत्रकपदी नितीन भागवत यांची निवड केल्याची माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
महात्मा फुले यांच्या मूळ गावी खानवडी येथे सोमवारी (ता. २७) साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलन भरविले जाते. यावर्षी संमेलनाध्यक्षपदी नेमणूक झालेल्या डॉ. स्वाती शिंदे या गेली ३० वर्षे राज्यभर साहित्य चळवळीत सहभागी असून, ‘वाटेवरती काचा गं’ हे त्यांचे कवितेचे पुस्तक विशेष गाजले.
स्वागताध्यक्षपदी निवड झालेले ह.भ.प. उंद्रे हे अध्यात्मिक विकास परिषदेचे अध्यक्ष असून, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. वात्सल्य धाम ही गोशाळा चालवित असून, ज्ञानलीला वारकरी शिक्षण संस्था स्थापना केली आहे. साप्ताहिक ज्ञानलीलाचे ते संपादक आहेत. तर निमंत्रकपदी असलेले नितीन भागवत हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. संमेलनास उद्घाटक म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते बाबाराजे जाधवराव उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सजंय जगताप, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, विजयराव कोलते, सुदाम इंगळे, दत्ता झुरुंगे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे आदी उपस्थित राहणार आहेत. मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक जयप्रकाश घुमटकर, कवयित्री ललिता गवांदे उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनात ग्रंथपूजन, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. सोमवारी (ता. २७) दुपारी १२.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार असून, दुपारी २.३० वाजता क्रांतीसूर्य महात्मा फुले या विषयावर डॉ. जगदीश शेवते यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे.
यापूर्वी झालेल्या महात्मा फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत, इतिहासाचार्य मा. म. देशमुख, म. भा. चव्हाण, प्रा. गंगाधर बनबरे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, प्रा. रतनलाल सोनग्रा, डाँ. सय्यद जब्बार पटेल, डाँ. जयप्रकाश घुमटकर, दशरथ यादव, भा. ल. ठाणगे, रावसाहेब पवार, अविनाश ठाकरे यांनी भुषविले आहे. संमेलनाचे संयोजन राजाभाऊ जगताप, दत्ता भोंगळे, गंगाराम जाधव, शामराव मेमाणे, सुनील लोणकर, नंदकुमार दिवसे, दत्ता कड, रवींद्र फुले, दत्ता होले, अरविंद जगताप, संजय सोनवणे, दीपक पवार, विजय तुपे यांनी केले आहे.