जालना : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणास्त्र उगारल्यानंतर सरकारने टिकणारे आरक्षण देण्यासाठी २ जानेवारीपर्यंत मुदत मागितली आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते आक्रमक झाले असून, सरसकट आरक्षण देऊ नये या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे सभा होत आहे. मनोज जरांगे यांनी बालहट्ट सोडावा. जरांगे जास्त बोलू नका, आमच्या हातात कोयता आहे.
लक्षात ठेवा रात्र वैऱ्याची आहे, असे म्हणत ओबीसी नेते आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. प्राध्यापक टी. पी. मुंडे म्हणाले की, जरांगे नावचं बाटूक आणि त्याच्या मागच्या लोकांना बघायचं आहे. त्यामुळे छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या मागे मराठा समाज उभा आहे. जरांगे यांनी जास्त बोलू नये, आमच्या हातात कोयता आहे. लक्षात ठेवा रात्र वैऱ्याची आहे.
बबनराव तायवाडे या वेळी बोलताना म्हणाले की, “मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. मराठा आंदोलकांकडून सरकारवर दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य मागास वर्गाकडून अगोदरच ओबीसीमध्ये आहेत, त्यांचे सर्वेक्षण करू नये. माजी आमदार आशिष देशमुख म्हणाले की, बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलनस्थळी सर्वात आधी देवेंद्र फडणवीस आले होते.
ओबीसींना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, सरसकटचे दाखले मराठा समाजाला देता येणार नाहीत. ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचे काम मनोज जरांगे करत आहेत. त्यामुळे त्यांनी बाल हट्ट सोडावा. ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांच्या विरोधातील वक्तव्ये तत्काळ थांबवायला हवीत, असा इशारा काँग्रेस आमदार राजेश राठोड यांनी दिला. राज्यातले साखर कारखाने भटक्या आणि विमुक्त लोकांच्या जीवावर सुरू आहेत, असेही राठोड यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी नेत्यांची सभा होणार आहे. या सभास्थळी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर, रासप प्रमुख महादेव जानकर, आमदार राजेश राठोड, मुस्लिम ओबीसी मोर्चाचे नेते शबीर अन्सारी, माजी आमदार आशिष देशमुख, माजी आमदार नारायणराव मुंढे, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, प्राध्यापक टी. पी. मुंडे हे उपस्थित राहणार आहेत.