जेजुरी : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर देवदर्शन घेतले. खंडोबा देवाला भंडारा अर्पण करून, मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळावे यासाठी साकडे घातले. मी एक इंचही मागे हटणार नाही, तुम्हीही मागे हटू नका, असे आवाहन करून, आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्हाला लवकर यश मिळू दे, अशी प्रार्थना त्यांनी खंडोबाचरणी केली.
खंडोबा देवस्थानच्या वतीने मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले. या वेळी जुनी जेजुरी परिसरातील मुख्य चौकात झालेल्या सभेत त्यांनी सकल मराठा बांधवांना संबोधित केले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी मी अखेरपर्यंत पाठपुरावा करणार आहे. याचे कारण म्हणजे मराठा समाज हा मुळातच मागासलेला समाज आहे. अनेकांच्या जुन्या दाखल्यांमध्ये कुणबी असल्याच्या नोंदी आहेत. जुन्या नोंदी आहेत, त्यांना ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे. एकट्या जेजुरी परिसरामध्ये शंभर नोंदी सापडल्या आहेत. एक नोंद सापडली तर सुमारे ६१२ जणांना आरक्षण मिळू शकते.
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मला कोणी अडवू शकत नाही. मी मागे हटणार नाही, तुम्हीही मागे हटू नका. समाज बांधवांनो, हा तुमचा भाऊ शेवटच्या श्वासापर्यंत आरक्षण मिळेपर्यंत लढणार आहे. माझे वजन ३५ किलो इतके हलक्यात घेत होते. मात्र, आता कसंही, कुठेही मोजा, ते पेलवणार नाही. फक्त मला आग्या मोहोळरूपी मराठा बाधवांच्या साथीची गरज आहे. तुम्ही मला साथ द्या, आरक्षणासाठी मी अखेरपर्यंत झटत राहणार आहे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन जेजुरी व परिसरातील सकल मराठा समाजाने केले होते.