Baby Whale Died In Ratnagiri : रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रकिनारी आलेल्या बेबी व्हेलची अखेर मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली आहे. व्हेल माशाच्या पिल्लाला दोन दिवसांत जवळपास पाच वेळा वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र ते अपयशी ठरले. अखेर त्याचा मृत्यू झाला. हा बेबी व्हेल 13 नोव्हेंबर रोजी सकाळी पहिल्यांदा निदर्शनास आला होता. त्याला पाण्यात सोडल्यानंतर बेबी व्हेल 15 नोव्हेंबरला संध्याकाळी पुन्हा समुद्रकिनारी आला होता.
खोल समुद्रात बेबी व्हेल भरकटला आणि रत्नागिरीतील गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आला. अवाढव्य वेबी व्हेलला पुन्हा समुद्रात लोटण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण फक्त प्रयत्न नाहीतर प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली होती. वेबी व्हेलची जगण्यासाठीची धडपड तब्बल 40 तास सुरू होती. 40 तासांनंतर अखेर या प्रयत्नांना यशही आलं होतं. पण काय झालं, कुणालाच नाही कळलं आणि पुन्हा एकदा बेबी व्हेल किनाऱ्यावर आला. किनाऱ्यावर आला आणि अखेर त्यानं मृत्यूसमोर हात टेकत आपला जीव सोडला.
अथक प्रयत्नही अयशस्वी
स्थानिकांनी बेबी व्हेलची त्वचा सतत पाणी टाकून ओली ठेवली होती. त्यामुळे हा धोका कमी करता आला. तसेच, पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक उपचारांचाही बेबी व्हेलला उपयोग झाला. त्यामुळेच तो एवढे दिवस किनाऱ्यावर तग धरू शकला. जेव्बा व्हेल मासा बांगडा किंवा तारली, माकूळ यांचा पाठलाग करत असतील तर ते किनाऱ्याकडे येऊ शकतात. अशा वेळी किनाऱ्यावरील वाळूत अडकून पडू शकतात. त्यांच्या महाकाय शरीराचा भार ते पाण्यात असताना सहज पेलतात. पण पाण्याबाहेर त्यांच्या वजनामुळेच त्यांची इंद्रिये दबली जातात, त्वचा सुकू लागते, चरबीच्या थरामुळे शरीरात खूप उष्णता निर्माण होते आणि अतिउष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊन ते मृत होतात.
3 महिने आईच्या दुधावर जगतो
साधारणपणे तीन वर्ष व्हेल माशाचं पिल्लू आईच्या दुधावर वाढतं. बेबी व्हेलला समुद्रातही त्याला त्याची आई भेटणं महत्वाचं होतं. बेबी व्हेल जन्माला आल्यानंतर लगेच दूध पिण्यास सुरुवात करतं. आपल्या आईला दुधाची भूक लागल्यावर कुठे स्पर्श करायचा याचं त्यांना उपजतच ज्ञान असतं. आईमध्ये असणाऱ्या मॅमरी स्लिट्स खाली असणाऱ्या स्तनाग्रांमधून दूध स्त्रवतं आणि पिल्लाच्या तोंडाजवळ दूध फवारलं जातं. हे पाण्यामध्ये फवारलं गेलेलं दूध बेबी व्हेल पितं.