पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार देणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. शिरूर लोकसभा जिंकण्याच्या उद्देशाने भाजपने तशी चाचपणी मतदार संघात पक्षाकडून करायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री रेणूका सिंह शिरूर लोकसभेचा तीन दिवसीय दौरा करत आहेत. रेणूका सिंह यांनीच यामागचा उद्देश सांगत मोठा खुलासा केला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकत वाढावी यासाठी केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर जबादारी दिली असून त्यासाठी तिन दिवस या मतदारसंघात फिरत असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या केंद्रीय नेत्या रेणूका सिंह यांनी दिली आहे.
रेणूका सिंह यांचा शिरुर लोकसभा मतदारसंघात ३ दिवस दौरा आहे. बुधवारी रात्री मंचर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचालेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या शिंदे गटात असलेले शिवाजी आढळराव पाटील शिरूर मतदासंघातून उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक आहेत. या जागेवर भाजप कुणाला उतरविणार हे अद्याप गुलदस्त्यात असतानाच पक्षाच्या या चालीने येथील शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काय होणार हाही मतदार संघातील सध्याचा सर्वाधिक राजकीय चर्चेचा व उत्सूकतेचा विषय बनला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना सोडणार होते. याच कारणामुळे आढळरावांनी शिंदे गटाशी घरोबा केला असल्याचं सांगितलं जातं. अशात आता भाजपनेही इथे आपला उमेदवार देण्याची तयारी केल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
याबाबत बोलताना रेणूका सिंह म्हणाल्या, की स्थानिक माजी खासदार आमच्यासोबत युतीत होते. तेव्हा त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, आता दिवस बदलले आहेत. आम्ही आमची ताकत आजमावनार आहोत. असं रेणूका सिंह यांनी म्हटलं. एकंदरीतच शिरूर मतदारसंघात भाजपचाच उमेदवार देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्याबद्दल सुरू असलेल्या उमेदवारीच्या चर्चेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.