Mumbai Air Quality Index : मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत हवेची पातळी दिवसेंदिवस खराब होताना दिसत होती. त्यातच दिवाळीत फटाके फोडण्याचं प्रमाण वाढल्यानं हवेची गुणवत्ता आणखी ढासळली आहे. दिवाळीपूर्वी अवकाळी पावसामुळे हवेतील धुलिकणांचं प्रमाण कमी झालं होतं. त्यामुळं हवेची पातळी किंचित सुधारली होती. पण, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुफान आतषबाजीमुळे हवेची पातळी पुन्हा खालावल्याचं चित्र दिसून येत आहे.
आतषबाजीचा फटका
मुंबईसह आजूबाजूच्या शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांची आतषबाजी झाली. हवेची पातळी खालावली असताना फटाके फोडण्याच्या वेळेसंबंधित दिलेले निर्बंध नागरिकांनी धाब्यावर बसवले आहेत. फटाके फोडण्यासाठी रात्री 8 ते 10 ची वेळ आहे. पण संध्याकाळपासून फटाके फोडण्यास सुरु झाल्याचं दिसून आलं. मध्यरात्रीनंतरही अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी सुरु होती. याचा परिणाम मुंबईतील हवेवर झाल्याचं दिसत आहे.
प्रदूषणात वाढ
मुंबईसह मुंबई उपनगरात फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता काहीशी नियंत्रणात होती. मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून बांधकामे स्थगित करण्यासाठीचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे दिवाळी आधी मुंबईच्या हवेची पातळी काहीशी सुधारली होती. पण, आता दिवाळीमध्ये हवेची पातळी पुन्हा घसरली आहे.