मंचर : मंचर शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या उत्तमभाग्य सोन्या-चांदीच्या दुकानात बुधवारी (ता. ८) पहाटे तिसऱ्या मजल्यावरील छतावरून सशस्त्र सात दरोडेखोरांनी प्रवेश केला. सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरटे घेऊन चालले होते. या वेळी यश समदडीया (वय २१) व जैना समदडीया (वय १७) या भावंडांनी धाडस दाखवून चोरट्यांचा प्रतिकार केला. यामुळे पळून जाणाऱ्या पाच दरोडेखोरांना रंगेहात पकडण्यात यश आले. याबद्दल यश व जैना समदडीया या भावंडांचा व मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे यांचा सन्मान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
मंचर येथील अभिजित समदडीया यांच्या मालकीचे उत्तमभाग्य सोन्या-चांदीचे दुकान आहे. पोलिसांनी व समदडीया यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरटे ड्रेनेजच्या पाईपवर चढून तिसऱ्या मजल्याच्या छतावर आले. तेथील दरवाजा तोडून चोरटे थेट तळातील दुकानात गेले. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बाजूला फिरविले. सायरनच्या वाहिन्या तोडून टाकल्या. १८ किलो ७०० ग्रॅम चांदीचे दागिने, पाच तोळे सोने व रोख रक्कम असा ऐवज त्यांनी घेतला. जिन्याने ते पहिल्या मजल्यावरून जात होते. त्यांच्या आवाजाने खोलीमध्ये झोपलेले अभिजित यांचे चिरंजीव यश यांना जाग आली. त्यांनी दरवाजा उघडून बाहेर पाहिले. लगेचच सहा चोरटे हातात कोयते घेऊन खोलीत आले.
या आवाजाने जागी झालेल्या जैनाने एका चोरट्याला लाथ मारली. दोन-तीन चोरट्यांनी तीच्या तोंडाला रुमाल बांधला. त्यावेळी तिने चोरट्यांना चावाही घेतला. यावेळी प्रतिकार करणाऱ्या यशलाही जखमी केले आहे. दरम्यान, जैनाने आरडाओरड केल्यामुळे नागरिक व पोलिसांची मदत मिळाली. पोलिसांसमवेत कुर्बान अली मिर व फैजान इनामदार यांनी छतावर जाऊन चोरट्यांना पकडले.
या पराक्रमाबद्दल दिलीप वळसे पाटील यांनी भावंडे व पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले. शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, कार्याध्यक्ष निलेश थोरात, बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, निरज समदडीया, दत्ता थोरात, सागर थोरात, सुहास बाणखेले आदी मान्यवर उपस्थित होते.