लोणी काळभोर : सध्या जगात सर्वात जास्त तरुण आपल्या देशात आहेत. पुढील ३० वर्षांनंतर जगातील सर्वांत जास्त म्हातारे भारतात असणार आहेत. त्यावेळी मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे, असे मत लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी व्यक्त केले.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट येथील समर्पण वृद्धाश्रमात दीपावलीचे औचित्य साधून फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी अमित गोरे बोलत होते. या वेळी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बाप्पू काळभोर, सुशील महाराज काळभोर, अशोक वक्ते, उत्तम सुतार, जगदीश महानवर, संस्थेचे संचालक राजेंद्र कांबळे व लक्ष्मण मासाळ, विनायक भस्मारे, वेलनेस कोच किशोर चव्हाण, अमोल सरोदे, उत्तम सुतार, नितीन बेंद्रे, भीमाशंकर पाटील, श्रीमंत चतुर्भुज, जालिंदर खराडे, नितीन पांचाळ, नितीन भांडवलकर व परिसरातील नागरिक, महिला भगिनी आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना अमित गोरे पुढे म्हणाले की, सध्या जपान देशामध्ये वृद्ध नागरिक जास्त व तरुण कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, तेथील सरकार, सामाजिक संस्था, वैद्यकीय क्षेत्र, समाज यांनी एकत्रितपणे आवश्यक ती उपाययोजना करुन वृद्ध नागरिकांना म्हातारपण सुसह्य केले आहे. आपल्या देशातही आतापासूनच या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत अमित गोरे यांनी व्यक्त केले.
समर्पण वृद्धाश्रमात सध्या महाराष्ट्र व परराज्यातील ५० आजी-आजोबा राहतात. त्यांची देखभाल करण्यासाठी १५ स्वयंसेवक कार्यरत आहेत. त्यांना नियमितपणे वैद्यकीय सेवा पुरवली जाते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर महेश खुळपे यांनी तर उपस्थितांचे आभार सोमनाथ पुणेकर यांनी मानले.