ठाणे: “तुम्ही मधमाशांच्या पोळ्यांवर दगड मारले आहेत. आता या मधमाशा कुठे ढसतील बघा. ठाण्यातील मुंब्र्याच्या शाखेची सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत. या गद्दारांचं डिपॉजिट जप्त करुन त्यांना घरी पाठवा. तुमच्यात हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करा आणि या”, असं आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. मुंब्र्यात जर अनुचित घडलं असतं तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. केसाला जरी धक्का लागला असता तर महाराष्ट्राने यांचे केस उपटून टाकले असते, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. मुंब्रा येथील शिवसेना शाखेवरुन ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आले आहेत. उद्धव ठाकरे मुंब्रा येथील शिवसेना शाखेच्या पाहणीसाठी गेल्यानंतर प्रचंड राडा झाला. त्यांना पोलिसांनी रोखल्याने ते माघारी परतले. त्यानंतर ठाकरे यांनी जवळच असलेल्या स्टेजवरुन उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
यापुढे येणारी कोणतीही निवडणूक असू द्या, आपण गद्दारांचं डिपॉझिट जप्त करु. उद्यापासून प्रत्येक शाखेत शिवसैनिक जमतील. नेभळटांनो, तुमच्यात हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करा आणि समोर या. मर्दाची अवलाद असेल तर या आणि आम्हाला भिडा, आमची तयारी आहे, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.
ठाकरेंच्या मुंब्रा दौऱ्यावेळी राडा
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुंब्रा दौऱ्यावर असातना, मोठा राडा झाला. मुंब्रा येथे ठाकरे गटाच्या शाखेवर एकनाथ शिंदे गटाने ताबा घेत, त्यावर बोलडझर फिरवल्याचा आरोप आहे. याच शाखेच्या पाहणीसाठी उद्धव ठाकरे मुंब्रा येथे दाखल झाले. परंतु, या शाखेकडे जाण्यापासून उद्धव ठाकरे यांना पोलिसांनी रोखलं. त्यानंतरही उद्धव ठाकरे गाडीतून उतरुन थेट बॅरिकेट्सजवळ पोहोचले. यावेळी मुंब्रा शाखेजवळ प्रचंड राडा पाहायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूने शिंदे गटाच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरु होती. त्यावेळी ठाकरे गटाचे शिवसैनिकही आक्रमक होऊन घोषणाबाजीनेच उत्तर देत होते.