पुणे : पुणे -सोलापूर महामार्गावर वारंवार होणारे अपघात व सततची वहातुक कोंडी टाळण्यासाठी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी (ता. दौंड) या दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण शुक्रवारी (ता. १६) हटवली जाणार आहेत. अतिक्रमन हटविण्याच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या अडचणी उभ्या राहु नयेत व कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकारी कार्यालय, सीजीएम (टेक) आणि आरओ मुंबई, हवेली व दौंड तहसीलदार कार्यालय, लोणी काळभोर पोलीस ठाणे यांची मदत मागवली आहे.
पुणे -सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ते कासुर्डी या दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणवर अतिक्रमणं वाढली आहेत. त्यामुळे ठीकठिकाणी पाणी साचून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्व हवेलीतील रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्ते हे चक्क वाहनतळ झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरून चालत जाणाऱ्या व्यक्तीला या वाहतूक कोंडीचा तोटा सहन करावा लागत आहे.
पुणे – सोलापूर महामार्गाच्या कडेला व्यावसायिक दुकाने असलेल्या इमारती उभारली आहेत. त्या इमारतीत वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ केलेले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या पथकरावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. याबाबत पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन ग्रामपंचायतीने NHAI ला वारंवार निवेदन दिले होते. या निवेदनानुसार शुक्रवारपासून हि कारवाई करण्यात येणार आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD ने उपलब्ध करून दिलेल्या ROW मध्ये 20m ते 40m (तपशील संलग्न) किमीच्या विभागात सध्याचे चार लेनिंग विकसित केले आहे. या विभागात सर्वत्र अनधिकृत अतिक्रमणे उभी असल्याचे निदर्शनास आले आहे. या आस्थापनांनी बिल्डिंग लाइन (37 मी) आणि नियंत्रण रेषा (50 मी) यासह कोणत्याही बांधकाम उपनियमांचे पालन केलेले नाही. या आस्थापनांमुळे पावसाच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात, विशेषतः उरुळी कांचन गावात अडथळा निर्माण झाला आहे. आस्थापना बिल्डिंग लाइनच्या पलीकडे स्थलांतरित करणे आवश्यक आहे.
या अनधिकृत अतिक्रमणांमुळेच परिसरात पाणी साचून राहण्याचे एकमेव कारण आहे कारण नैसर्गिक नाला अडवला गेला आहे. विषय महामार्गावर अनुचित घटना/दुर्घटना/अपघात होण्याची शक्यता आहे. वरील बाबी लक्षात घेता, प्रकल्प महामार्गालगत कोणतीही अनुचित घटना आणि पाणी साचू नये यासाठी अतिक्रमण हटवण्यासाठी शुक्रवारी (ता. १६) पोलीस संरक्षण देण्याची विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान लोणी काळभोर हद्दीतील माळीमळा, लोणी कॉर्नर व उरुळी कांचन हद्दीत तळवाडी चौकात अतिक्रमन हटवितांना गोंधळ होण्याची चिन्हे असल्याने, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पोलिसबंदोबस्तही मागवला आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेपूर्वी सर्व आस्थापनांना स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी आपल्या स्तरावर आवश्यक निर्देश जारी करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.