Rain and weather update मुंबई: राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू असताना आता त्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईसह कोकणात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार पाऊस झाला. त्यानंतर आता कोकणासह मध्य महाराष्ट्रातही वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे . पुढील 24 तासात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
गुरुवारी मुंबईत अचानक झालेल्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच, दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी बाहेर पडलेले ग्राहक आणि विक्रेत्यांचीही धावपळ झाली. मुंबईमध्ये पश्चिम उपनगरांत तसेच मध्य उपनगरात रात्री 8 नंतर अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबई, ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण आणि बदलापूर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस मुंबईसह उपनगरात पावसाची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस होत आहे. पुढील दोन दिवसही या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात पडत असलेल्या या पावसामुळे आंबा पिकांवर मोठे संकट येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही मागील दोन दिवसापासून होत असलेल्या पावसाने शेतकरी चिंतेत आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात पुढील 24 तासात दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात अल-निनो वादळाच्या संकटामुळे यंदा मान्सून काळात अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. अशातच आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.
दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबई विभागात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. याशिवाय पुढील 24 तासात देखील दमदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. परंतु, विदर्भ आणि मराठवाड्यात वातावरण कोरडेच असेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे.