राहुलकुमार अवचट
यवत : दिव्यांची महती सांगणारा सण म्हणजे दीपावली. दिवाळीला प्रत्येका घराच्या दारात आकाशकंदील लावला जातो. दिवाळीनिमित्त यवत बाजारपेठेत विविध रंगांचे आकर्षक आकाशकंदील विक्रीला आले आहेत. विक्रेत्यांनी रंगीबेरंगी पणत्या, रांगोळी, आकाशकंदील, घरगुती सजावटीचे साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. या सणाला दिव्यांचे विशेष महत्त्व असते. यामुळे बाजारात मातीचे, चिनी मातीचे, प्लास्टिकचे दिवे विक्रीसाठी ठेवले आहेत. महिला, तरुणींची खरेदीसाठी गर्दी होत आहे. ग्राहकांची बाजारात लगबग वाढू लागली आहे. नोकरदारवर्गाची दिवाळी खरेदीसाठी लगबग सुरू आहे. मात्र, कमी पाऊस झाल्याने यंदा शेतकरी ऐन दीपावलीच्या तोंडावर हवालदिल झाल्याचे चित्र आहे.
दीपावली सणाचे आबालवृद्धांना विशेष आकर्षण असते. पाच दिवसांच्या या सणामध्ये प्रत्येक दिवसाचे एक वेगळे दिनविशेष असल्याने प्रत्येक दिवसासाठी लागणाऱ्या विविध स्वरूपातील वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारपेठेत हळूहळू गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची आपल्या दुकानाला पहिली पसंती मिळावी यासाठी दुकानदारांनीही आपापली दुकाने विविध प्रकारे सजवून ठेवली आहेत. किराणा सामान, फटाक्यांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फूलवाले, कपड्यांची दुकाने, मिठाईची दुकाने, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने गर्दीने फुललेली दिसत आहेत.
बाजारपेठेतील आकाशकंदील लक्ष वेधत आहेत. प्रकाशाचा झगमगाट करणारे आकाश कंदील, दिवे, पणत्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. विविध डिझाइन, आकारांतील आकाशकंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, कागदांच्या वाढत्या किंमतीमुळे यंदा आकाशकंदील जवळपास २० टक्क्यांनी महागले आहेत. दीपोत्सवासाठी रंगीबेरंगी कागदी, कापडी आणि प्लास्टिकचे आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. चांदणी कंदील खातोय भाव, असे चित्र पाहण्यासाठी मिळत आहेत. पारंपरिक आणि काही नव्या प्रकारातील आकर्षक आकाश कंदिलांनी बाजारपेठा सजल्या आहेत. चांदणी, पेशवाई, टोमॅटो बॉल, पॅराशूट यांच्यासह इको फ्रेंडली हॅण्डमेड आकाशकंदील यंदा बाजारात उपलब्ध झाले आहेत. कागदी, प्लास्टिक, पीव्हीसी, मेटॅलिक अशा अनेक प्रकारांत दे कंदील आहेत.
दिवाळीच्या आतषबाजीला महागाईचे ग्रहण
कमी पाऊस, वातावरणातील बदल यामुळे शेतकरी हवालदील झालेला आहे. यातच यंदा फटाक्यांच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या किंमतीतही काही प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे लहान मुलांसह फटाके फोडणाऱ्यांना देखील चिंता सतावत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यवत ग्रामपंचायतीने सर्व फटाका दुकाने बाजार मैदानात एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने नागरिकांची सोय झाली आहे.