सातारा : सातारा शहराचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले (वय-७५) यांचे आज मंगळवारी (ता.१३) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. शिवाजीराजे भोसले यांच्या निधनामुमुळे सातारकरांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
साताऱ्याच्या राजघराण्यातील शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून शिवाजीराजे भोसले यांची ओळख होती. शिवाजीराजे भोसले हे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे काका होते. सातारा जिल्ह्यात ज्यावेळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद टोकाला गेले त्यावेळी राजघराण्यातील वैरत्व संपवण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
शिवाजीराजे भोसले यांना खेळाची आवड होती. महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे ते राज्य उपाध्यक्ष होते. तसेच शिक्षण क्षेत्रात ही त्यांनी काम केले आहे . सातारा शहरातील आरे गावच्या श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. शिवतेज माध्यमिक विद्यालय, आरे या संस्थेच्या उल्लेखनीय कार्यात त्यांचे नेहमी मार्गदर्शन असायचे.
दरम्यान,शिवाजीराजे भोसले यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सायंकाळी साधारण साडे पाचच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आज रात्री शिवाजीराजे भोसले यांचे पार्थिव अदालत वाड्यात आणण्यात येणार आहे. बुधवारी त्यांच्यावर संगम माहूली येथील कैलाश स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील.