राहुलकुमार अवचट
यवत : केडगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत आरामदायी बसमधून लेडीज बॅग व त्यामधील सोन्याचे दागिने पळवून नेणाऱ्या एका चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात यवत पोलिसांच्या तपास पथकाला यश आले आहे.
याप्रकरणी यवत पोलिसांनी इस्माईल बाबू खान( वय ३६ रा.धरमपुरी बायपास ता. मनावर जि. धार राज्य- मध्यप्रदेश) याला अटक केली असून त्याच्याकडून १८ तोळे वजनाचे ९ लाख ३६ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दौंड यांनी दोन दिवस रिमांड पोलीस कास्टडी मंजूर केली आहे.
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, केडगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत ३१ जुलैला श्री विश्व ट्रॅव्हल्स या आरामदायी बसमध्ये बसलेल्या जागेवरून लेडीज बॅग व त्यामधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कागदपत्रे असा एकूण ११ लाख १३ हजार ५००रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात अनुराधा आनंद चांडक (रा. पुणे मुळ रा. उस्मानाबाद) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सदर घटनेचा यवत पोलीस तपास करीत असताना एका खबऱ्यामार्फत पोलिसांना माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा मध्यप्रदेशातील इसमाने केला आहे. त्यानुसार यवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, पोलीस नाईक अक्षय यादव यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन ७ दिवस मध्यप्रदेशमधील विविध ठिकाणी तपास केला. तपासादरम्यान सदर इसम खेरवा ता. मनावर जि. धार येथे असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे मनावर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अलवा व यवत पोलीस स्टेशन पथकाने इस्माईल बाबू खान यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपीने गुन्हा कबूल करून गुन्हयातील चोरीस गेलेले १८ तोळे वजनाचे ९ लाख ३६ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दौंड यांनी दोन दिवस रिमांड पोलीस कास्टडी मंजूर केली आहे.
सदरची कारवाई यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, यवत गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, दामोदर होळकर, वसीमोद्दीन शेख अकोला,पोलीस मित्र निलेश चव्हाण यांनी केली आहे.