Maratha Reservation हिंगोली : राज्य सरकारला टिकणारे मराठा आरक्षण देण्यासाठी २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या आंदोलक मनोज जरांगे यांनी १५ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे. आता मराठा समाजाला शिक्षण, नोकरीसोबतच राजकीय आरक्षण मिळण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे. आरक्षणासाठी सकारात्मक वातावरण असतानाही, आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यातील आजरसोंडा येथील आणखी एका तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने आपले जीवन संपवले आहे. घरातील विजेच्या तारांना पकडून त्याने आत्महत्या केली आहे. मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे का? असा प्रश्न त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून उपस्थित केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मराठा समाजासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आदिनाथ राखोंडे (वय २७) असे आहे. उच्चशिक्षित असूनही नोकरी मिळत नसल्याने तो सतत तणावात होता. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये देखील आदित्यने सहभाग घेतला होता. नैराश्यामुळे अखेर त्याने आत्महत्येचा मार्ग स्विकारला. मराठा आरक्षणासाठी विजेच्या तारांना स्पर्श करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये त्याने प्रश्न उपस्थित केला आहे. एक मराठा लाख मराठा… मी सतत बातम्या पाहत आहे व मला असे वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझे उच्च शिक्षण होऊनसुद्धा मला नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का? मी हतबल होऊन आज रात्री माझे जीवन संपवत आहे, असा उल्लेख चिठ्ठीमध्ये केला आहे.
देवगाव रंगारी येथे एकाची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील ३९ वर्षीय तरुणाने विषारी द्रव पिऊन स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संजय साईनाथ सोनवणे असे तरुणाचे नाव आहे.
आत्महत्या रोखण्यासाठी जरांगे आवाहन करणार…
मनोज जरांगे हे १५ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते गावागावात सभा घेणार असून, आत्महत्या रोखण्यासाठी कळकळीचे आवाहन करणार आहेत. १ डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे.