लोणी काळभोर, (पुणे) : अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली ) येथील चिंतामणी मंदिरात भाविकांनी अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी (ता. १३ ) मोठ्या प्रमाणात पहाटेपासूनच गर्दी केली होती.
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद तांबे यांनी सांगितले की, भाद्रपद महिन्यातील अंगारकी चतुर्थीचा योग आहे.
अंगारकी चतुर्थी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात चिंतामणीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. विद्याधर आगलावे यांच्या हस्ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ‘श्रीं’ ची पूजा केली तर चिंचवड देवस्थान ट्रस्च्या वतीने महापूजा करून सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.
चिंतामणी गणपती मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कैरी, कोकम, विविध प्रकारचे पेरू, तसेच नारळ, दुर्वा विकण्यासाठी महिला विक्रेत्या व नागरिक बसले होते. यावेळी येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करताना दिसून येत होते. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, हार, फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले आदी विक्रेते दिसून येत होते. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांसह विक्रेत्यांची मोठी वर्दळ पहायला मिळत होती.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि आगलावे बंधूंच्या वतीने मंदिर प्रांगणात मंडप घालण्यात आला होता. देवस्थानच्या वतीने मंदिराबाहेर दर्शन बारी बांधण्यात आली होती तसेच त्यावर छत टाकण्यात आला होता. मंदिरात फुलांची आरास, डेकोरेशन करण्यात आले होते. सायं ७ ते ९ या वेळामध्ये ह. भ. प. रोहिदास महाराज बांगर (मुंबई) यांचे सुश्राव्य हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर चंद्रोदयानंतर श्री चा छबिना झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.
प्राथमिक शाळेपासून रस्त्याच्या काँक्रीट करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे भाविकांना त्रास होता ते काम पूर्णत्वाकडे जात असताना तुरळक वाहतूक सुरू करण्यात आली. नेहमीप्रमाणे देवस्थानच्या वतीने भाविकांना उपवासाची खिचडी, केळीचे वाटप करण्यात आले ग्रामपंचायत तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आळंदी येथील स्वकाम सेवा मंडळाने स्वच्छतेचे व पोलीस मित्र मंडळ, सुरक्षारक्षक, मंडळातर्फे सुव्यवस्था राखण्यात मदत केली अंगारकी चतुर्थीच्या मंदिरातील सर्व व्यवस्थेवर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद महाराज तांबे लक्ष ठेऊन होते.