लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका ट्रॅक्टर वितरकाची तब्बल पाच कोटी रुपयांची राष्ट्रीयकृत बँकेच्या ९ आधिका-यांनी संगनमत करुन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती न्यायालयाच्या आदेशानुसार ९ आधिका-यांविरोधात बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यु.एम. बाजी, अवनीश कुमार, जयकिसन रोडा, चूक साहेब (चौघे रा. एरंडवणे, पुणे), नागेश्वर राव, संदीप माळी, विरेंद्र रावखंडे, अजय गुप्ता (चौघे रा. गुलटेकडी, पुणे ) व वैभव पाटील (थेऊर शाखा व्यवस्थापक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या ९ आधिका-यांची नावे आहेत.
याप्रकरणी मनोहर बबनराव खैरे (वय-४२, भिगवण बारामती रोड, जळोची, बारामती, मुळ गाव लोणी काळभोर, ता. हवेली ) यांनी बारामती येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ अंतर्गत कलम १५६(३) अन्वये गुन्हा दाखल करुन तपास करण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्या ट्रॅक्टर कंपनीने ऑगस्ट २०१५ मध्ये बडोदा बँकेतून कर्ज काढले होते. फिर्यादी मनोहर खैरे हे फक्त दोन कोटी रूपये कर्जाला जामीनदार आहेत आणि ५ कोटी रुपये ही बँक गॅरंटी आहे. यावेळी बडोदा बँकेच्या अधिका-यांनी फिर्यादीच्या विविध कागदपत्रांवर सह्या घेतल्या. त्यापैकी काही कागदपत्रे ही कोरी होती. बँकेच्याआधिका-यांनी त्या वेळी फिर्यादीला सांगितलं कि बँकेचे १२ कोटी रुपये कर्ज मंजूर केले आहे. कंपोझीट हायपोथेकेशन करारामध्ये कर्ज हे ७ कोटी रूपयांचे आहे. दोन कोटी रुपये कर्ज समजून फिर्यादीने सर्व कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या.
सर्व कागदपत्रे पाहिल्यावर बँक ऑफ बडोदाने खोटेपणाकरून पाच कोटी रुपयांची बँक गॅरंटी कर्जाला जोडली. मात्र फिर्यादीने पाच कोटी रुपयांच्या बँक गॅरंटीला कधीही हमी दिली नव्हती. बँक ऑफ बडोदाने सुर्या ट्रक्टर्स कंपनीला फक्त २ कोटी रुपये कर्ज दिले होते. नंतर बँकेने पाच कोटी रुपयांच्या बँक गॅरंटीतील चार कोटी दहा लाख रुपये न्यू हाॅलंड ट्रॅक्टर कंपनीला वर्ग केले. या संदर्भात बॅन्केने सी.एन.एच इंडस्ट्रीयल इंडिया प्रा लि यांना पत्र पाठवून हि रक्कम परत पाठवण्याचे निर्देश दिले. परंतू त्या कंपनीने पैसे परत केले नाहीत.
दरम्यान, कर्ज परतफेड करण्यासाठी फिर्यादीकडे बेकायदेशीर आणि फसवणूकीने पैसे मागितले जात आहेत. प्रत्यक्षात बँकेने सुर्या ट्रॅक्टर्स कंपनीस केवळ दोन कोटी रुपये कर्ज दिले असताना सात कोटी कर्ज व त्या वरील व्याज असे एकूण १८ कोटी रुपयांची मागणी बँक फिर्यादीकडे करत आहे. ज्या बँक गॅरंटीस फिर्यादी जामिनदार नव्हते, त्या रकमेची बँक मागणी करत आहे. त्यामुळे फिर्यादीने बारामती न्यायालयात तक्रार दाखल केला होता. बारामती पोलीसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करत आहेत.