PDCC Bank News : पुणे : पुणे जिल्हा बँक संचालक पदाचा निकाल जाहीर झाला आहे. पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काहीच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँक संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी पार्थ पवार यांची नियुक्ती लागेल असं सांगण्यात येत होत. त्यानंतर आता संचालकपदी रणजित तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रणजित तावरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
रणजित तावरे यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. संचालकपदी रणजीत तावरे यांची सर्वानुमते निवड झाल्याने युवकांनी एकच जल्लोष केला. या निवड प्रक्रियेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा अनेक दिवस चालू होती. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी इच्छुक असलेले बारामतीतील मदनराव देवकाते यांचेही नाव घेतले जात होते. परंतु ही राजकीय पार्श्वभूमी विचारात न घेता अजित पवार यांनी तावरे कुटुंबीयांना संधी दिल्याचे स्पष्ट झाले.
कोण आहेत रणजीत तावरे
नवनिर्वाचित संचालक रणजीत तावरे हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे पुतणे आहेत. रणजीत तावरे हे माळेगाव येथील राजहंस सहकार संकुल या वित्तीय संस्थेचे कामकाज पाहात आहेत. सामाजिक क्षेत्राबरोबरच ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कामात सक्रिय आहेत.