लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील सेवा रस्ते व रस्त्यावरील खड्डे येत्या दोन दिवसात बुजविले जातील असे आश्वासन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी संजय कदम यांनी दिले आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील भाजपचे शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी संजय कदम यांना पुणे-सोलापूर महामार्गावरील समस्यांचे लेखी निवेदन दिले. यावेळी कदम यांनी हि माहिती दिली.
निवेदनात म्हटले आहे, पुणे -सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत एम.आय.टी. या शौक्षणिक संस्थेत जाण्यासाठी पुलाखाली दोन मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून नामांकित एका कंपनीत जाण्यासाठी व एम.आय.टी. या शौक्षणिक संस्थेत जाण्यासाठी या रस्त्याचा ८० टक्के नागरिक वापर करतात.
मात्र या ठिकाणी मागील अनेक दिवसापासून दोन मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने व खड्ड्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. तसेच त्याच ठिकाणी दोन्ही बाजूला ठिकठिकाणी दगडं रोवली असून त्यामूळे आधीच अरुंद असलेला रस्ता अधिकच छोटा पडत आहे. तरी दगडी अनावश्यक असल्यास दगडी त्वरित काढून टाकाव्यात.
महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ-मोठी झाडे उगवलेली दिसून येत आहेत. एमआयटी चौक व रेल्वे स्टेशन चौक येथे सिग्नल बसवण्यात आले आहेत. त्याचे काम त्वरित सुरु करण्यात यावे. महामार्गावर थर्मो प्लास्टिक स्ट्रिप्स बसवण्याचे काम राहिले आहे ते त्वरित पूर्ण करावे, एंजल हायस्कूल शेजारी जगताप नर्सरी या ठिकाणी नर्सरी मालकाने सर्विस रोड वरती भली मोठी दगडी व मुरूम टाकून सर्विस रोड एक प्रकारे अडवला आहे. तरी त्यांना त्वरित दगडी व मुरुम काढून टाकण्यास सांगण्यात यावे.
टोल नाका ते लोणी काळभोर शिवशक्ती चौक पर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत परंतु अजूनही बऱ्याचश्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी समोरील सर्विस रोड वरती संपूर्णपणे कंपनीचे टँकर उभे असतात. नागरिकांना हा रस्ता गेली अनेक वर्ष वापरता येत नाही. त्यांना त्वरित आदेश काढून सदर टँकर हटवण्याबाबत सांगण्यात यावे. अशी मागणीहि निवेदनाद्वारे शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांनी केली आहे.