लहू चव्हाण
पाचगणी : ऑलिंपिक स्पर्धांमध्ये आपल्या देशाची यशस्वीता पाहता वाढणारी आकडेवारी कौतुकास्पद आहे. खरे ऑलिंपिकवीर भारताच्या विविध खेड्या गावांमध्ये घडताना दिसत आहेत. असे प्रतिपादन क्रीडाभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष तथा अखिल भारतीय नियामक मंडलाचे सदस्य विजय पुरंदरे यांनी केले आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडू आणि त्यांचे पालक, मार्गदर्शक आणि क्रीडाशिक्षक यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन क्रीडाभारती पाचगणी-महाबळेश्वर यांच्यावतीने नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना वरील प्रतिपादन पुरंदरे यांनी केले आहे.
यावेळी कार्यक्रम अध्यक्ष म्हणून भारताच्या अर्जुन पुरस्कार विजेत्या प्रथम महिला कबड्डीपटू तथा पश्चिम महाराष्ट्र प्रांत क्रीडा भारतीच्या उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, उत्कृष्ट बॅडमिंटनपटू हरीश अनघळकर, सुप्रसिद्ध डॉ. अभय व अंजना देशपांडे, डॉ. सुधीर व भारती बोधे, डॉ. नितीन व यामनी देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरंदरे पुढे म्हणाले, खेळाडूंनी पालकांना व प्रशिक्षकांना सतत प्रश्न विचारत राहावे. जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा आपल्याला उपयोग होईल. कठोर परिश्रम व आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही यशस्वी खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवू शकता.
यावेळी महाबळेश्वर तालुक्यातील सन २०११ पासून आज अखेर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडाप्रकारांमध्ये स्वतःचे, गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे तसेच राज्याचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणारे यशस्वी खेळाडू यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, मानाची शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन त्यांच्या मातापितांसह तब्बल २९ खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
पाचगणी येथील डॉ. राजाराम कांबळे सरांनी अर्थशास्त्र विषयात नुकतीच पीएचडी संपादन केल्याबद्दल त्यांच्या सर्व कुटुंबीयांसमवेत त्यांचादेखील सन्मान करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय प्राविण्यप्राप्त खेळाडू प्रतिनिधी अक्षय वाडकर आणि अंजली बावळेकर यांनी क्रीडाभारती संस्थेमार्फत मिळालेल्या सन्मानाबद्दल संयोजकांचे आभार मानले. तर या कार्यक्रमासाठी जतीन भिलारे आणि तेजस्विनी भिलारे यांनी सभागृह आणि इतर सर्व भौतिक सुविधा हिलरेंज माध्यमिक विद्यालयात उपलब्ध करून दिल्या.
तसेच एलआयसी सातारा विभागाचे अनुसे सर यांनी खेळाडूंच्या सन्मानाप्रित्यर्थ सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रांची अनमोल भेट दिली.दरम्यान, या सन्मान सोहळ्यापूर्वी क्रीडाभारती पाचगणी महाबळेश्वर साठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच तालुकास्तरावरील कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
स्वप्ना केळकर – अध्यक्ष, सुनील गुरव – उपाध्यक्ष, शिवाजी निकम – उपाध्यक्ष आणि श्रीगणेश शेंडे – मंत्री असा पदभार वरिष्ठांकडून सुपूर्द करण्यात आला.इथून पुढे देखील क्रीडाविषयक असेच अनेक उपक्रम राबविण्यात यावेत. अशी मागणी यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष गुरव यांनी केली आहे.
या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुनील गुरव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्ना केळकर यांनी केले. श्रीगणेश शेंडे यांनी प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी केलेल्या कामगिरी सह सर्व खेळाडूंच्या यादीचे वाचन केले. तसेच त्यांना व्यासपीठावर आमंत्रित केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन शिवाजी निकम यांनी केले.