पुणे : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारही केंद्रातील मोदी सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांना सन्मान निधी देणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच राज्य सरकार लवकरच मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना (CM Kisan Sanman Nidhi Yojana) सुरू करणार आहे. मुख्यमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे. यासंदर्भात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. येत्या आर्थिक वर्षात त्यासाठी तरतूद केली जाईल.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत, केंद्रातील मोदी सरकार दरवर्षी 6,000 रुपये थेट देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवते. हे पैसे सरकार तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना देते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत केंद्र सरकारने 11 हप्ते जारी केले आहेत. महाराष्ट्रातील 1,14,82,157 शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी मिळतो.
प्रस्तावित योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे निकष सरकार लवकरच ठरवणार आहे. राज्य सरकारच्या सूत्रांनी फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, योजनेच्या तपशीलावर काम केले जात आहे आणि अर्थसंकल्पीय तरतूद करून ती केली जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार कृती आराखडा आणणार असल्याची घोषणा केली होती आणि शेतकऱ्यांनी हार न मानण्याचे आवाहन केले होते.
केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. हे पाहता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारलाही ही योजना सुरू करायची आहे. 6 हजार रुपयांची ही रक्कम एकत्र देण्याऐवजी समान हप्त्यांमध्ये दिली जाईल. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. ही मिनी विधानसभा निवडणूक मानली जात आहे. निवडणुकीपूर्वी राज्य सरकार ही योजना जाहीर करू शकते.