पुणे : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने नवीन ‘पेन्शन प्लस’ ही योजना दाखल केली आहे. पाच सप्टेंबरपासून ती लागू झाली असल्याचे एलआयसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दरमहा एक ठराविक रक्कम हातात मिळावी यासाठी गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.
मुंबईत झालेल्या विमा सप्ताहाच्या शानदार समारंभात ही योजना दाखल करण्यात आली. यावेळी एलआयसीचे अध्यक्ष, एलआयसी आणि सेबीचे माजी अध्यक्ष जी. एन. वाजपेयी, एलआयसी आणि आयआरडीएआयचे माजी अध्यक्ष टी. एस. विजयन यांच्यासह एलआयसीचे अन्य माजी संचालक उपस्थित होते.
ही एक नॉन-पार्टिसिपेटेड, युनिट लिंक्ड, वैयक्तिक पेन्शन योजना असून, ती निवृत्तीधारकांना पद्धतशीर आणि शिस्तबद्ध बचत करून मोठा निधी तयार करण्यास मदत करते. ही योजना तरुणांनाही त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी आर्थिक नियोजन करण्यात मदत करेल. यामध्ये मुदतीच्या शेवटी अॅन्युइटी प्लॅनद्वारे नियमित उत्पन्न घेता येते. ही योजना एकल प्रीमियम किंवा नियमित प्रीमियम तत्वावरही घेता येते.
ग्राहकाला पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागतो. यामध्ये ग्राहकांसाठी प्रीमियमच्या रकमेची मर्यादा वेगळी असू शकते. ग्राहकांना चार प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या फंडात गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडता येतो.
एका वर्षात चार वेळा मोफत फंड बदलण्याची सुविधाही आहे. फंडाची कामगिरी आणि व्यवस्थापन शुल्क यावरून या योजनेची एनएव्ही ठरवली जाईल. एनएव्ही दररोज ठरवली जाईल. पाच वर्षानंतर गुंतवणूकीतील काही भाग काढून घेण्याची तरतूद आहे. ग्राहक ही नवीन पेन्शन पॉलिसी ऑफलाइन एजंटकडून किंवा एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवरून ती ऑनलाइन खरेदी करू शकतात, असे एलआयसीने म्हटले आहे.