मुंबई: ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटीलला मिळालेल्या राजकीय आश्रयावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ललित पाटीलला २०२० मध्ये अटक झाली, तेव्हा तो शिवसेनेचा नाशिक शहराध्यक्ष होता, असा आरोप केला. तसेच ललित पाटील हा शिवसेनेचा पदाधिकारी होता म्हणूनच त्याला तेव्हा विशेष सवलत मिळाली का? असा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
,
उद्धव ठाकरे म्हणाले, “ललित पाटील प्रकरणातील सत्य काय आहे? हे सर्वांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर आमच्या खासदार अरविंद सावंत यांनीही उत्तर दिलं आहे. खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारेही बोलत आहेत. त्यामुळे फडणवीसांकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत.”
“बॉम्बस्फोटाच्यावेळी दाऊद भाजपा अध्यक्ष होता का?”
“देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यानुसार, ललित पाटीलला अटक केली, तेव्हा तो शिवसेनेचा नाशिक शहराध्यक्ष होता. मात्र, असं म्हणणं म्हणजे बॉम्बस्फोटाच्यावेळी दाऊद भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होता, असं म्हणण्यासारखं आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला.