हडपसर : पुणे-सोलापूर महामार्गवरील हडपसर येथे ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना आज शुक्रवारी (ता.९) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता कि, दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिची अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
वर्षाराणी राहुल बोरावके (वय ३६ रा. गाडीतळ, हडपसर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर तिची मुलगी समृद्धी राहुल बोरावके (वय १५) हि गंभीर जखमी झाली. याप्रकरणी राहुल बोरावके (वय ४४) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिसांनी ट्रकचालक किरण रामकृष्ण सानप (वय २२, रा. वडझरी, ता. पाटोदा, जि. बीड) याल अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाराणी आणि त्यांची मुलगी समृद्धी या पुणे-सोलापूर रस्त्यावरील लक्ष्मी कॉलोनी परिसरातून दुपारी पावणेबाराच्या सुमारास जात होत्या. त्या वेळी भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात वर्षाराणी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांची मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर हडपसर येथील एका रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी राहुल बोरावके यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दरम्यान, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ट्रकचालक किरण सानप याला अटक केली आहे. तरी, पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार करीत आहेत.