पुणे : दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून (ता.९) अर्ज भरता येणार आहे. राज्य मंडळाने एटीकेटी सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेशाची संधी देण्यासाठी ‘विशेष प्रवेश फेरी दोन’चे आयोजन केले आहे.
‘एटीकेटी’ची सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरताना दहावीच्या गुणपत्रकांमधील सहा विषयांमध्ये मिळालेले ६०० पैकी गुण नोंदवावेत, अशी सूचना राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केली आहे. या फेरीची गुणवत्ता यादी १५ सप्टेंबरला जाहीर होणार आहे.
एटीकेटी असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपला प्रवेश अर्ज भरून भाग एक आणि भाग दोन पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे. अर्जाचा भाग एक यापूर्वी भरलेला असल्यास त्यामधील माहिती आवश्यकतेनुसार सुधारित करावी आणि लॉक करावी, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता. ९) ते रविवार (ता. ११) दरम्यान नवीन अर्ज भरता येणार असून, याच कालावधीत प्रवेश अर्ज प्रमाणित करणे, पसंतीक्रम नोंदविणे ही प्रवेशाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. ही फेरी सुरू असतानाच कोटा आणि द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असणार आहे. अधिक माहिती मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.