मुंबई: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation ) मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे. सुनील कावळे (45 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुनील कावळे हे जालन्याचे रहिवाशी असल्याचे माहिती मिळत आहे. त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये एक सुसाईड नोट सापडली आहे. मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका, असे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. आत्महत्या करणारा तरुण हा मूळचा अंबड तालुक्यातील असून त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे एक शिष्टमंडळ सायन रुग्णालयमध्ये जाऊन मयत तरुणाच्या कुटुंबाचा भेट घेणार आहेत. (Maratha Reservation)
सुसाईड नोटमध्ये काय?
मयत सुनील बाबुराव कावळे यांच्या बॅगमध्ये पोलिसांना मोबाईला फोन आणि एक सुसाईड नोट सापडली आहे. नोटच्या शेवटी त्यांनी सर्वांची माफी देखील मागितली आहे. कावळे हे मुंबईत कधी आले त्यांच्यासोबत कोण होते? या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
विनोद पाटील यांचे आवाहन
आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी हा योग्य मार्ग नाही. अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने जिंकले आहेत. तुम्ही खचून जाऊ नका, असे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे. लढाई अर्ध्यावर टाकून तर मुळीच जाऊच नका! राज्य सरकारला एवढीच विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही सरकारला जाग येत नाही. यापेक्षा अधिक मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे. (Maratha Reservation)
हेही वाचा: