पुणे : गणेश विसर्जनामुळे शुक्रवारी पुण्यात पीएमपीच्या वाहतुकीत मोठा बदल केला आहे. मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या सर्व बस रद्द केल्या आहेत. मात्र उपनगरांत सुमारे ११०० बस धावतील.
प्रवाशांची कमीत कमी गैरसोय व्हावी या करिता पीएमपी प्रशासन प्रयत्न करणार आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार हा बदल केला जात आहे.महापालिका ते चिंचवड या फेऱ्या नियमित होणार आहेत.
स्वारगेट-हडपसर, कात्रज-हडपसर अशा उपनगरांत धावणाऱ्या बस मात्र धावणार आहेत. त्यामुळे उपनगरांतील प्रवाशांची सोय होणार आहे. स्वारगेट-शिवाजीनगर, कात्रज-विद्यापीठ, भक्ती शक्ती अशा मध्यवर्ती भागांतून जाणाऱ्या बस रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळ व दुपारच्या दोन्ही सत्रांत मिळून सुमारे ५३८ बस रद्द केल्या आहेत.
छत्रपती संभाजी महाराज पूल बंद झाल्यावर बसची वाहतूक एसएनडीटी कॉलेज येथून सुरू होणार आहे. स्वारगेटहून पिंपरीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या शंकरशेठ रस्त्याने नेहरू रस्त्यामार्गे जाणार आहे. नेहरू रस्ता बंद झाल्यावर या मार्गावरच वाहतूक पुणे स्टेशन मार्गे सुरू राहणार आहे.