पुणे: अनेक खेळाडू आयसीसी विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहेत, ज्याचा परिणाम आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत देखील दिसून येत आहे. भारताचा रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. आता त्याने आयसीसीच्या सर्वोत्तम फलंदाजांच्या क्रमवारीतही मोठी झेप घेतली आहे. (ICC ODI Rankings)
त्याच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकनेही सलग शतकी खेळी खेळून आपल्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. न्यूझीलंडचा सलामीचा गोलंदाज ट्रेंट बोल्टला गोलंदाजीत सर्वाधिक फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने त्याचा सहकारी रासी वन डर दूसेला मागे टाकत फलंदाजांच्या क्रमवारीत तिसरे स्थान पटकावले आहे.
सर्वाधिक फायदा रोहित शर्माला झाला
रोहित शर्माने डी कॉकपेक्षा मोठी झेप घेतली आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 131 धावांची आणि पाकिस्तानविरुद्ध 86 धावांची खेळी करून आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पाच स्थानांनी झेप घेतली आहे. आता रोहित सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाज 19व्या स्थानावरून 18व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अजूनही आयसीसी वनडे फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तो 836 गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून शुभमन गिल 818 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. (ICC ODI Rankings)
विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले, तर तो 711 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. केएल राहुलच्या फलंदाजीच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. काही चांगल्या खेळीमुळे तो 20 वरून 19 व्या क्रमांकावर गेला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या गोलंदाजी क्रमवारीबद्दल बोलायचे झाल्यास जोस हेझलवूड 660 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु, ट्रेंट बोल्टने चमकदार कामगिरी करत 659 गुण मिळवले आहेत आणि तो क्रमांक एकच्या अगदी जवळ आला आहे. यामध्ये मोहम्मद सिराज 656 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या टॉप-10 मध्ये दुसरा भारतीय गोलंदाज कुलदीप यादव आहे, जो 641 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
हेही वाचा:
कामाची गोष्ट: तुम्हाला सर्व ई-मेल आपोआप फॉरवर्ड करायचेत, मग अशी करा जीमेलमध्ये सेटिंग
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची भेट, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी केली वाढ