पुणे : पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी चौकाजवळ एका मसाज सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय चालत असल्याचा पुणे ग्रामीण अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाच्या पोलीसांनी पर्दापाश केला आहे. पोलिसांनी मसाज सेंटरवर मंगळवारी (ता.६) छापा टाकून ५ महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी मसाज मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला आहे.
स्पा सेंटरची चालक-मालक सीमा दीपक धोत्रे (वय ३७, रा. नवी सांगवी) आणि स्पा सेंटरचा मॅनेजर रमेश कुमार साहीराम (वय २४, रा. गंगानगर, राजस्थान) यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे ग्रामीण अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी चौकाजवळ एका मसाज सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून कारवाई केली.
दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी ५ पीडित महिलांची सुटका केली आहे. तर सदर ठिकाणाहून ५ हजाराची रोकड, १४० रुपये किमतीचे इतर साहित्य ८ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन, असा सुमारे १३ हजार १४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हि कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाट, सुधा टोके, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे आणि रेश्मा झावरे यांच्या पथकाने केली आहे.