पुणे : पुणे जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींची निवडणूक ८ सप्टेंबरला होणार आहे. या निवडणुकीत सरपंच पदासाठी तब्बल २१२ जण रिंगणात उतरले आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानुसार या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड थेट होणार आहे
जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आलेल्या ३१५ अर्जांपैकी १०३ जणांनी माघार घेतली असून, २१२ जणांमध्ये निवडणूक होणार आहे. तर ४८५ सदस्य पदांसाठी ९३० अर्ज दाखल झाले होते. त्यातील २३४ जणांनी माघार घेतली असून, ६९६ उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर या ग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून, १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
जुन्नर तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १२८, आंबेगावमध्ये १८ जागांसाठी ६६, खेडमध्ये ५ जागांसाठी १० आणि भोरमधील २ जागांसाठी २ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ६१ ग्रामपंचायतींची सदस्यपदांच्या ४८५ जागांसाठी १२१ अर्ज वैध ठरले होते. त्यातील २३४ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता भोर तालुक्यातील १८ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. खेडमधील ३५ सदस्य पदांसाठी ५०, आंबेगाव तालुक्यातील १४४ जागांसाठी २०३ आणि जुन्नरमधील २८८ जागांसाठी ३९८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १ हजार १६६ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी १४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बार्पे बुद्रुक आणि चांदखेड (ता. मुळशी) या दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.