पुणे : एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्रालयाने (एमओई) आयोजित केलेल्या स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) 2022 ग्रँड फिनाले फेरीत 1 लाख रुपयांचे पहिले पारितोषिक जिंकले होते. या विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी विद्यापीठाच्यावतीने विजेत्या संघाला प्रत्येकी १ लाख आणि सहभागी संघांना ३० हजार रुपयांचे बक्षिस देऊन सन्मानित केले.
यावेळी एमआयटी एडीटी युनिवर्सिटीचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. विनायक घैसास, डॉ. मोहित दुबे, डॉ. रेणू व्यास, डॉ. रेखा सुगंधी, डॉ. विरेंद्र भोजवानी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते
स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) 2022 ची ग्रँड फिनाले फेरी २५ ते २९ ऑगस्ट २०२२ रोजी फोर्ज एक्सीलरेटर कोईम्बतूर, तमिळनाडू येथील नोडल सेंटर आणि सेंच्युरियन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (CUTM), भुवनेश्वर येथे पार पडली होती. बायोइंजीनिअरिंग अभ्यासक्रमात शिकत असलेल्या सिरी संपगावकर, अंशुमी पाटील, आर्या पदुरे, सब्यसा बॅनर्जी, समृद्धी वालस्कर आणि शर्वरी देशमुख यांनी १ लाख रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले.
सदाफ शेख यांच्या नेतृत्वाखालील ‘अल-एफए’ या दुसऱ्या संघातील सर्वेश जाधव, सुमेध येवले, प्राजक्ता धारवाड, अथर्व टिके आणि किरण मराठे यांनी उच्च उंचीवरील संरक्षण कर्मचार्यांसाठी रेडी टु यूज फर्स्ट-एड किटवर त्यांचे नावीन्य असलेल्या प्रोडक्ट दाखवले. सेंच्युरियन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (CUTM), भुवनेश्वर येथे झालेल्या या स्पर्धेत १ लाख रुपयांचे पहिले पारितोषिक जिंकले.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले की, विद्यापीठाने स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२२ मध्ये विविध संशोधन उपक्रमांमध्ये राष्ट्रीय टॉपर्सच्या यादीत स्थान मिळविणाऱ्या एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याना विद्यापीठातर्फे प्रत्येक १ लाखाचे रोख पुरस्कार दिले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आता भारताला अशा लोकांची गरज आहे जे उद्योजकता कौशल्ये प्रदान करतील. नवोन्मेष आणि उद्योजकता कौशल्यांद्वारे विद्यार्थी ही त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात आणू शकतात. एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीने नावीन्यपूर्ण आणि उद्योजकता निर्माण करण्याची विद्यापीठाने प्रतिज्ञा घेतली आहे. आम्ही विद्यार्थ्यांना नावीन्य आणि कल्पनांसाठी प्रोत्साहन देतो.