केडगाव / संदीप टूले : पितृ पक्ष संपून येणाऱ्या घटस्थापनेच्या दिवशी शिंदे-फडणवीस-पवार या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असून, यात जवळपास 14 आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. पवारांच्या बालेकिल्ल्यात पवारांना थेट आव्हान देणाऱ्या, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्गीय समजल्या जाणारे दौंडचे आमदार राहुल कुल यांना मंत्रिपदाची वर्णी लागणार या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भाजपचे एकमेव आमदार राहुल कुल असून, आगामी बारामती लोकसभेच्या तयारीनुसार कुल यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वाढली असून, कुल हे बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी असून, त्यांच्या पत्नी कांचन कुल या बारामती लोकसभेसाठी भाजपकडून तिकीट मिळण्याच्या प्रबळ दावेदार समजल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने कुल यांना ताकद मिळण्यासाठी मंत्रिपद दिले जाणार आहे, अशी चर्चा चालू आहे. तसेच त्याच अनुषंगाने तालुक्याचे अनेक वर्षांचे मंत्रिपदाचे स्वप्नही पूर्ण होऊ शकणार आहे.
राज्यात अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत असताना मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्यातील अजित पवार, दिलीप वळसे पाटील, काँग्रेसमध्ये असताना हर्षवर्धन पाटील यांनाच नेहमी संधी मिळाल्याने दौंड तालुक्याला मंत्रिपदापासून नेहमीच वंचित राहावे लागले. याचे शल्य तालुक्याला आहे. यापूर्वी सुभाष कुल, रंजना कुल यांना मंत्रिपदाची संधी होती. मात्र, बारामतीकरांमुळे ते मिळू शकले नाही, असा आरोप कुलांचे कार्यकर्ते हे करत असतात.
गेली चार वर्षांच्या महाविकास आघाडी व त्यानंतर महायुती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवारांशी जवळीकता ठेवून तसेच महायुती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय वर्तुळात राहून कुल यांनी तालुक्यातील कामे मार्गी लावली. सत्ता कोणाचीही असो, निधी मिळवण्यात कुल यांचा हातखंडा आहे. दौंड तालुक्याला कुल यांच्या रूपाने पहिल्यांदा मंत्री मिळावा ही दौंडच्या जनतेची मनोमन इच्छा असून, या यंदातरी ही इच्छा पूर्ण होईल, अशी आशा आहे.
दौंडच्या जनतेला २०१९ साली दिलेल्या शब्द फडणवीस पाळणार का?
२०१९ साली विधानसभेच्या निवडणुकीवेळी वरवंड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विराट अशी सभा झाली होती. त्यावेळेस त्यांनी सभेला संबोधित करताना दौंडच्या जनतेला एक शब्द दिला होता की, तुम्ही राहुल कुल यांना तुम्ही निवडून द्या, मी त्यांना मंत्री करतो, या शब्दाची आठवण दौंडकरांनी पुन्हा करून दिली आहे.