पुणे : वडकी (ता. हवेली) येथे २०१६ मध्ये झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी हिंदु राष्ट्र सेनेचा पदाधिकारी तुषार हंबीर याच्यावर ससून रुग्णालयात शिरुन गोळीबार व तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी केली आहे.
सागर हनुमंत ओव्हाळ (वय -२२) बालाजी हनुमंत ओव्हाळ (वय २३), रा. दोघेही, बनकर कॉलनी, हडपसर), सुरज शेख (वय १९, रा. हरपळे चाळ, हडपसर), सागर आटोळे (वय २१, रा. वडकी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार साहील इनामदार हा फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू राष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीर हा मागील अनेक वर्षांपासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. मागील आठ ते दहा दिवसापासून त्याची तब्बेत बिघडली असल्याने हंबीरला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री नातेवाईक असल्याचे सांगून पाच जण ससून रुग्णालयात शिरले. त्यांच्यातील एकाने आपल्याकडील पिस्तुलातून तुषार हंबीरच्या दिशेने गोळीबार केला. परंतु, पिस्तुलातून गोळी फायरच झाली नाही.
मात्र हल्लेखोरांनी कोयत्याने व तलवारीने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र ड्युटीवर असलेले पोलिस कर्मचारी अमोल बागड व व हंबीर याचा मेव्हणा शुभम रांदड हे सावध झाले. हल्लेखोर तलवार व कोयत्याने हंबीर याच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्न करीत असतानाच हे दोघे मध्ये पडले. हल्लेखोरांनी त्यांच्यावर वार करुन जखमी केले. पोलीस गार्ड बागड यांनी रायफल काढल्याने हल्लेखोर पळून गेले होते. त्यांचा बंडगार्डन व हडपरसर पोलिसांची पथके तपास करीत होते.
त्यानुसार पोलिसांनी वरील चौघांना अटक केली असून त्यांनी तपासादरम्यान वडकी (ता. हवेली) येथे २०१६ मध्ये झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी हिंदु राष्ट्र सेनेचा पदाधिकारी तुषार हंबीर याच्यावर ससून रुग्णालयात शिरुन गोळीबार व तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याबाबत ३०२ चा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात तुषार हंबीरला मोक्का लावण्यात आला आहे. त्या गुन्ह्यामध्ये तो येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी म्हणून आहे.